Tuesday 15 November 2016

पुनर्जन्म आणि परमपद

     अरुण दातेच्या एका गाण्याच्या ओळी आहेत --
अफाट जगती जीवर् जगतन्
दुवे निखळता कोठुन मीलन ?
जीव बिचारा हा तुजवाचून जन्मांमधुनी पिसाट फिरता
भेट घडे का जिवा ?
      ८४ लक्ष योनींच्या फे-याभोवती विणलेला मायेचा पसारा हा किती क्लिष्ट असू शकतो ते ह्या ओळींतून स्पष्ट होतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं असं एक स्वतंत्र शरीर असतं. जन्माला आलेला कधी ना कधी मरणार हे उघड आहे. पण केवळ एवढ्यावरच विसंबून राहून "प्रत्येक वादाचा निवाडा हा कुस्ती खेळूनच करायचा - जो जिंकला तो बाजीराव, मेला तो फालतू" असं म्हटलं तर व्यवस्था सुरळीत चालू शकत नाही, एकूणच मालमत्ता निर्मितीचा आणि पर्यायाने विकासाचा वेग मंदावतो. अशी विकास खुंटलेली किंवा ऋण विकासदर असलेली व्यवस्था अश्मयुगाकडे वाटचाल करायला लागते. हे टाळण्यासाठी युद्ध टाळणारी पण system power_balance चं यथार्थ simulation करणारी व्यवस्था बनवावी लागते. पुनर्जन्म आणि ८४ लक्ष योनींचा फेरा मिळून power balance चं नेमकं simulation होतं.
      आता सुरुवातीच्या गाण्यात असलेल्या "जीव" ह्या शब्दाची व्याख्या करूया. एखादी व्यक्ती कशी आहे हे सांगतांना आपण नुसतं "साडेसहा फूट उंची, ८२ किलो वजन, ५६ इंची छाती" एवढंच सांगत नाही. हे त्या व्यक्तीच्या शरीराचं वर्णन झालं. पण हा ओंडा नुसताच दंडबैठका काढणारा अडाणी गडी आहे की त्याच्या कवटीत मठ्ठपणाच्या भुश्याखेरीज थोडं ज्ञानभांडारही आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ह्याचाच अर्थ "प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच्या देहाखेरीज असं काही असतं की ज्याने त्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होते". आता ही ओळख त्या व्यक्तीची आहे म्हणजे नक्की कोणाची आहे तर त्या व्यक्तीच्या देहात जो जीव असतो त्या जीवाची असते. इथे वैदिक साहित्यवाल्यांसारखं जीवाला आत्मा किंवा जीवात्मा समजण्याची चूक कराल तर घोटाळा होईल. कारण "एम्.ए., पीएच्.डी. कंसात मराठी" अशी ओळख जीवाचीच असू शकते, अनादि अनंत अशा परमतत्त्वाचा अच्छेद्य भाग असलेल्या आत्म्यासाठी अशी मायेच्या पसा-यातली ओळख असू शकत नाही.
      "जीव" म्हणजे काय हे समजल्यावर मृत्यू आणि पुनर्जन्म म्हणजे काय हे जाणून घेणं सोपं जातं. मनुष्याचं आयुष्य साधारणपणे ८० वर्षांचं धरलं तर ह्याचा अर्थ ८० वर्षांत मनुष्याचा देह एकदाच मरतो. पण ह्या ८० वर्षांमधे मनुष्यदेहात वास्तव्य करून बसलेला जीव आपल्या ८४ लक्ष योनींचे अनेक फेरे पूर्ण करू शकतो. म्हणजेच आज तुमच्या देहात असलेला जीव उद्या तुमच्याऐवजी दुस-या व्यक्तीच्या देहात वास्तव्याला जाईल आणि अन्य कोणा व्यक्तीच्या देहातला जीव तुमच्या देहात वास्तव्य करायला येईल. ह्यालाच जीवांनी देहान्तर केलं असं म्हणता येतं. बोलतांना आपण जसं विषयांतर करतो तसा जीव देहान्तर करतो !
जीवाचा हा देहबदल अनेक कारणांमुळे होऊ शकतो.
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान् |
कारणं गुणसङ्गोsस्य सदसद्योनिजन्मसु|
      काही जीवांना सत्त्वगुण जास्त हवे असतात, काहींना रजोगुण तर काही जीवांना तमोगुणांचं आकर्षण असतं. म्हणजेच प्रत्येक जीव हा सत्त्व, रज आणि तम अशा त्रिगुणांचं किती मिश्रण हाताळू शकतो ह्याला मर्यादा असते. ती मर्यादा जर तुमच्या कर्मांमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणाने ओलांडली गेली तर तो जीव देहान्तर करतो आणि त्याच्या मर्यादेच्या आत असणा-या व्यक्तीच्या देहात वास्तव्यासाठी जातो. आणि अन्य एखाद्या व्यक्तीच्या देहातला जीव तुमच्या देहात वास्तव्यासाठी येतो. सर्वसाधारणपणे व्यक्तीची सत्त्व, रज, तम गुणांची जशी आवड असते त्या आवडीशी सुसंगत असाच जीव त्या त्या व्यक्तीच्या देहात वास्तव्यासाठी येतो. अर्थात दुष्प्रवृत्ती जर तुमच्यावर सतत हल्ला करत असतील तर तुम्हांला सत्त्व गुणाची आवड असली तरी तुमच्या देहात नव्याने वास्तव्यासाठी आलेला, मायेने बद्ध असलेला जीव हा, दुष्प्रवृत्तींनी पाठवलेला असल्यामुळे, तुमच्यामधे तमोगुणांची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत रहातो. अशा परिस्थितीत तुम्हांला जन्म मरणाच्या जास्त फे-यांना तोंड द्यावं लागतं. कारण तुमच्या देहातल्या तमोगुणी बद्ध जीवाला हुसकावून लावण्यासाठी तुम्ही सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करता, पण दुष्प्रवृत्तींच्या रेट्यामुळे त्यानंतर तुमच्या देहात येणारा बद्ध जीव हा परत तमोगुणीच असू शकतो. हे चक्र बराच काळ अव्याहत चालू रहातं. अशा परिस्थितीतही जेव्हां तुम्ही दुष्प्रवृत्तींविरोधातला लढा जोमाने चालू ठेवता तेव्हां तुमच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत आहेत असं म्हणता येतं. कारण अनेक जन्म घेऊनही तुमची "सत्याची कास धरून असत्याला विरोध करण्याची प्रवृत्ती" बदललेली नसते. तुमचा हा सत्त्वभारित स्वभाव आणि तुमच्या देहातील बद्ध जीवाची तामसी वृत्ती ह्यातल्या विरोधाभासाचा सामना तुम्ही सदैव करत असता.
      एका जाहिरातीमधे - बहुधा प्लायवूड कंपनीची जाहिरात असेल - दाखवलंय की पंजाबच्या एका सरदारजीचे कुटुंबीय तामिळनाडूतल्या township मधे रस्त्यावरून चालले होते. त्या कुटुंबात ७ - ८ वर्षांचा एक बालसरदारजीही होता. चालता चालता मधेच त्या बालसरदारजीच्या पूर्वजन्माच्या स्मृती जागृत होतात आणि तो रस्त्यावर सगळ्यांच्या पुढे भरभर चालायला लागतो. कुटुंबातल्या बाकिच्यांना कळत नाही काय झालं ते. सगळे जण "अरे थांब, थांब" असं म्हणत त्याच्यामागे धावायला लागतात. तो बालसरदारजी भराभर बरेच गल्लीबोळ बदलून शेवटी एका घरासमोर उभा रहातो आणि खणखणीत आवाजात साद घालतो, "सावित्री..."
      आपल्याला एवढ्या मोठ्याने हाक कोण मारतंय हे बघण्यासाठी घरातून एक पंचाहत्तरीला टेकलेली पांढ-या साडीतली म्हातारी बाहेर येते आणि समोर बघते तर हा बालसरदारजी ! ती त्याला घरात यायला सांगते. हा बालसरदारजी तडक घरात शिरतो आणि एका प्लायवूडच्या आसनावर जाऊन बसतो. त्या म्हातारीला आश्चर्य वाटतं कारण ते आसन काही वर्षांपूर्वी निवर्तलेल्या तिच्या नव-याचं असतं आणि नवरा गेल्यापासून नव-याची स्मृती म्हणून जपलेल्या त्या आसनाचा वापर कोणीच करत नव्हतं. त्यामुळे आश्चर्यचकित झालेली म्हातारी त्या आसनस्थ बालसरदारजीची विचारपूस करायला लागते की "कोण रे बाबा, तू ? कुठून आलास आणि माझं नाव तुला कसं कळलं ?" आणि थोड्याच वेळात त्या म्हातारीच्या लक्षात येतं की काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आपल्या नव-यानेच ह्या बालसरदारजीच्या रूपात पुन्हां जन्म घेतला आहे आणि एकदम ती "स्वामी" असं म्हणून त्या बालसरदारजीचे पाय धरते !
      आता 'बालसरदारजीच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत होणं' ह्या घटनेमधे किती महान काव्य दडलेलं आहे हे सांगण्यासाठी कोण्या "एम्.ए., पीएच्. डी. कंसात मराठी" अशी बिरुदावली धारण करणा-या बुद्धिजीवीची गरज तुम्हांला भासणार नाही, पण महत्त्वाचा मुद्दा असा की 'गतजन्मातल्या स्मृती' अशा विषयांवरचे अनुभव वाचतांना, ऐकतांना 'देह - जीव - पुनर्जन्माचा फेरा' ह्याबाबतचं ह्या पाठातलं सुरुवातीचं विश्लेषण ध्यानात घेतलं पाहिजे.
      तर ह्या बालसरदारजीच्या कथानकाच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे दुष्प्रवृत्तींविरोधात लढतांना तुमचा सत्त्वभावित स्वभाव आणि तुमच्या देहात वास्तव्य करून असणा-या बद्ध जीवाची तामसी वृत्ती ह्यांच्यातल्या विरोधाभासाचा सामना तुम्ही सदैव करत असता. मग ह्यावर काही उपाय नाही का ? उपाय आहे. स्वतः भगवंतांनीच तो सांगून ठेवलेला आहे :
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् |
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः |
      भगवंतांच्या निकट राहिलात की तुमच्या देहातला जीव हा तुमचा देह सोडून दुस-या देहात जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजेच तुमच्यासाठी (तुमच्या देहातील जीवासाठी) पुनर्जन्म नसतो. म्हणजेच पर्यायाने तुमचा जन्म मरणाचा फेरा टळतो आणि तुमच्या अस्तित्वाला एक प्रकारचं स्थैर्य येतं. भगवंतांशी एकरूप झालात की तुमच्या देहात वास्तव्य करणारा जीव हासुद्धा भगवंतांशी तादात्म्य पावलेलाच असतो. त्यामुळे तो जीव कोणत्याही योनीतला असला तरी तुमचा स्वभाव आणि त्या जीवाची वृत्ती ह्यामधे विरोधाभास रहात नाही. कारण तुम्ही भगवंतांच्या निकट असल्यामुळे तो जीव तुमची वृत्ती प्रभावित करू शकत नाही तर तुमच्या सत्त्वभारित स्वभावामुळे तो जीवच प्रभावित होतो आणि मायेच्या पसा-यातून मुक्त होतो. म्हणजेच असा जीव मायेने बद्ध रहात नाही.
      तुमचा देह अधिक देहातील जीव मिळून तुमचं जे अस्तित्व बनतं ते संपूर्ण अस्तित्व जर भगवंतांच्या परमधामाजवळ असेल (म्हणजेच जर तुमचं पूर्ण अस्तित्व भगवंतांशी एकरूप झालं असेल) तर तुम्ही परमपदावर पोचलेले आहात असं म्हणता येतं. परमपदापर्यंत पोहोचण्यामधे प्रमुख अडसर म्हणजे "तुमचं मुक्तसङ्ग अवस्थेत नसणं". जगात बहुतांश जणं ही ह्या ना त्या पद्धतीने उर्वरित समाजाशी जोडलेली असतात. समाजव्यवस्थेच्या उतररंडीवर ( hierarchy वर) तुमच्या खाली कोणीतरी असतं तसंच तुमच्या वर कोणीतरी असतं. पर्यायाने तुम्ही कोणाला ना कोणाला तरी उत्तरदायी असताच ! तुमचं वैयक्तिक जीवन आणि एकूण समाजव्यवस्था सुरळीत चालू रहाण्यासाठी भले ही व्यवस्था उपयुक्त असेल पण अशा व्यवस्थेत राहून तुम्हांला परमपदापर्यंत पोचता येणार नाही. You cannot realise God, unless you are FREE. आता तुमचं वैयक्तिक जीवन आणि एकूण समाजव्यवस्था जर सुरळीत चालू असेल तर परमपदाकडे जायचा खटाटोप करायचाच कशाला ? ह्याचं उत्तर असं आहे की समाजव्यवस्था सुरळीत चालू आहे म्हणजे सर्व काही योग्य त-हेने चालू आहे असं नाही; फक्त सरळसरळ आंदोलनं, मारामा-या, युद्धं चालू नाहीत एवढंच. शोषितांचा आवाज पूर्णपणे दडपून टाकला तरीसुद्धा अशी चमत्कारिक शांतता अनुभवायला मिळते. Summer Time Holiday सारख्या हॉलिवूड चित्रपटांमधे अशीच भयावह शांतता वेगळ्या संदर्भात चित्रीत केली आहे. आणि तुमचं व्यक्तिगत जीवन आज सुरळीत चालू आहे पण उद्याही ते तसंच चालू राहील असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल का ? जर सांगू शकत असाल तर रहा आहात तिथेच, परमपदाकडे जाण्याची तुम्हांला गरज नाही. पण साधारणपणे आयुष्य इतकं सरळधोपट नसतं. मायेच्या पसा-यात फिरतांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, भवसागर पार करतांना मधेच गटांगळ्या खायची वेळ येते. अनेकदा जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर, अस्थायी असल्यासारखं वाटतं. अशा वेळेस तुम्हांला काही शाश्वत आधाराची गरज भासते, परमेश्वराचं स्वरूप नक्की कसं आहे ते समजून घ्यावसं वाटतं. तुम्हांला नेमकी दिशा दाखवणारा कोणीही तुमच्या आजूबाजूला दिसत नाही. सगळे नुसतीच पोपटपंची करणारे खुशालचेंडू वाटतात. मनाच्या अशा संभ्रमित, अशांत अवस्थेत असाल तरच तुम्हांला परमपदापर्यंत जाऊन गूढ प्रश्नांची उकल करून घ्यावीशी वाटते, ह्या अनित्य, अशाश्वत जगापेक्षा काही शाश्वत, चिरस्थायी आहे का ते शोधण्याची ओढ लागते.
      तर आता परमपदाकडे जायचं हे नक्की ठरल्यावर प्रश्न येतो तो म्हणजे परमपदाकडे जाण्यासाठी नक्की काय करायचं ? दिल्लीला जायचं तर राजधानी एक्स्प्रेस आहे, इंग्लंड अमेरिकेत जायचं तर विमानं आहेत, लक्झरी क्रूझेस् आहेत. पण परमपदाकडे जायचं तर कोणत्या रस्त्याने जायचं ? परमपद मिळवणं म्हणजे भगवंतांचं निरंतर सान्निध्य मिळवणं. त्यासाठी भगवंतांचं परमधाम कुठे आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे.
अव्यक्तोSक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् |
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम् |
      मायेच्या पसा-याचे व्यक्त आणि अव्यक्त असे दोन भाग केले तर त्या अव्यक्ताहूनही अव्यक्त असं चिरंतन तत्त्व चराचराला व्यापून राहिलेलं असतं. त्या परम अव्यक्ताला अक्षर जगत् असं म्हणतात. त्या अक्षर जगतातलं असं स्थान की, जिथे पोचल्यावर परत मायेच्या पसा-याकडे फिरकावं लागत नाही, तेच भगवंतांचं परमधाम आहे. त्या परमधामापर्यंत जाऊन भगवंतांबरोबर एकरूप झालं की मनुष्य परमगतीला प्राप्त होतो म्हणजेच असा मनुष्य परमपदावर विराजमान होतो.
      आता कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते नक्की झाल्यावर पुढचा प्रश्न म्हणजे तिथे जाण्यासाठी काही गाडीघोड्याची सोय आहे की असंच पायीपायी वाळवंट तुडवत मुक्कामी जायचं ? भगवंतांनी ह्यावर एक सरळ सोपा उपाय सांगितला आहे. ध्यानधारणेमधे एका विशिष्ट प्रक्रियेतून गेलं की अक्षर जगतात आणि तिथून पुढे थेट भगवंतांच्या परमधामाकडे जाता येतं :
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च |
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् |
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् |
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् |
       इथे परत लक्षात घ्यायची गोष्ट ही की "देहत्याग" म्हणजे तुमच्या शरीराचा अन्त नव्हे तर "देहत्याग" म्हणजे तुमच्या देहात वास्तव्य करून बसलेला जीव तुमच्या देहाचा त्याग करून दुस-याच्या देहात प्रवेश करतो आणि भगवंतांशी एकरूप झालेला जीव तुमच्या देहात वास्तव्यासाठी येतो…

No comments:

Post a Comment