Thursday 8 September 2016

परमपदानंतर काय ?

परमपदानंतर काय ?
भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करतांना भगवान म्हणतात :
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् | 
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् |
वेद आणि उपनिषदवाले म्हणूनच भगवंतांवर खार खाऊन असतात. कारण वरच्या श्लोकात वेदांना अश्वत्थ वृक्षाची पानं म्हणून संबोधलं आहे आणि आद्य पुरुष वृक्षाच्या मुळापाशी आहे असं म्हटलं आहे. आता अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या आणि पानं ही मायारूपी पसा-याच्या प्रमाणात वाढतात : 
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः | 
म्हणजेच वेद आणि उपनिषदं ही मायेच्या पसा-याचं वर्णन करतात, मायेच्या पसा-यातून बाहेर कसं पडायचं ते सांगत नाहीत. त्यासाठी वेदांत रेषेच्या पलिकडे जाऊन योगसाधनेद्वारा परमपवित्र निर्गुणाबरोबर एकरूप व्हावं लागतं : 
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन | 
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो नित्ययोगस्थः आत्मवान् | 
. . . पण एवढं सगळं करण्याची इच्छा आणि क्षमता ह्या मुंडनवाल्या खुशालचेंडूंकडे नाही. अरे, नुसती मस्तकावरची केसं कापून कुठच्याही अस्वलाचा बृहस्पती होतो का काय ? त्यासाठी अथक परिश्रम करत काट्याकुट्यांनी भरलेल्या योगसाधनेच्या मार्गावर वाटचाल करावी लागते : 
 क्लेशोsधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् | 
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते | 
"भगवंत म्हणजे सर्वात श्रेष्ठ व्यक्त पुरुष" अशा बिनबुडाच्या व्याख्या करणा-या मुंडनवाल्या अस्वलांना "अव्यक्त" हा शब्द लिहिता वाचता तरी येतो काय ? आपल्या विरोधात जाणा-या प्रत्येकाला "पाखंडी" म्हणत बसण्यापेक्षा स्वतःच्या वैदिक साहित्यातला भोंगळटपणा कमी केला असतात तर मुंडनवाल्या गावंढळांवर आज अशी भादरून घ्यायची वेळ आली नसती ! नको तिथे लई केसं वाढली ह्या वेदवाल्यांच्या अंगावर : नाकात केसं, कानात केसं, पाठीवर केसं, छातीवर केसं, बेंबीवर केसं. आता फक्त एका विविक्षित इंद्रियावर केसं फुटायची तेवढी बाकी आहेत म्हणजे मग समोर म्हैस आणा नाहीतर अप्सरा - एक ठोका मारला की आनंदाचे डोही आनंद तरंग ! असो.
. . . तर अव्यक्ताची उपासना ही क्लेशकारक असते आणि मुंडनवाल्या खुशालचेंडूंना तर बूड न हलवता नुसती पोपटपंची करून निवांत आयुष्य घालवायचं आहे. मग ह्यावर त्या रिकामटेकड्यांनी उपाय काय शोधला तर "स्वत:ला ईश्वर समजणा-या वंशवादी भुक्कडांचं बिनदिक्कत लांगूलचालन करायचं" ! आता वंशवाद्यांच्या कवट्यांमधे अहंकाराचा किती भुसा भरलेला आहे पहा : 
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि |  
ईश्वरोsहमहं भोगी सिद्धोsहं बलवान्सुखी |
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् | 
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् | 
. . . अहो, ह्या वंशवाद्यांच्या भुक्कडगिरीचं संपूर्ण वर्णन कसं काय करणार ? हिमालयाच्या आसनावर, सप्तसिंधू भरतील एवढी शाई घेऊन साक्षात् सरस्वती महावृक्षांच्या फांद्यांची लेखणी करून अहोरात्र लिहीत बसली तरी ह्या वंशवाद्यांच्या कवट्यांमधल्या भुक्कडगिरीच्या भुश्याचं समग्र वर्णन करणं तिला जमणार नाही. 
. . . असे हे महान वंशवादी म्हणजे नक्की कोण तर संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्या जनुकांइतके उत्तम जनुक (genes) कोणाचेही नाहीत असं समजणारे genius मठ्ठोबा ! अरे, हिटलरचे रणगाडे बघून पळत सुटणारी खुळसटं तुम्ही. गर्दभाच्या पिपाणीत घालून वाजवतो तुमचं जनुक औत्तम़्य (gene superiority) ! उगाच भृकट्या वर कशाला नेताय ? "दुर्बल" शब्दावरून "दौर्बल्य" शब्द बनतो तसा "उत्तम" शब्दावरून "औत्तम्य" ! ह्यालाच शुद्ध मराठीमधे "बुद्धिजीवीगिरी", साध्या इंग्रजीमधे intellectual snobbery आणि अतिशुद्ध इंग्रजीमधे intellectualism असं म्हणतात. आणि वर अशी बुद्धिजीवीगिरी करायला सोकावलेले पोपट आम्हांला काय सांगतात की "तुमची भाषा फार कठोर आहे. तिला लय नाही, ताल नाही, माधुर्य नाही, मायेचा ओलावा नाही." अरे ओलाव्याच्या, कडंकडंनं घरला जा. बेवड्याला "मद्यपी" म्हटलंत तर त्याला आपला सन्मान झाल्यासारखा वाटतो, एखाद्या अक्करमाशाला नुसतं "दुष्कृतीन्" म्हणून संबोधलंत तर त्याला वाटतं "सौजन्यमूर्ती" म्हणून आपला सन्मानच होतोय. समोरच्याला जी भाषा समजते ती वापरायची की ह्या "एम.ए., पीएच्.डी कंसात मराठी" वाल्यांना रुचेल ती भाषा वापरायची ? असो.
. . . तर ही अव्यक्ताची क्लेशकारक उपासना टाळण्यासाठी वंशवाद्याच्या वळचणीला गेलेले गावंढळ मुंडनवाले काय अकलेचे तारे तोडतात तर म्हणे, "भगवद्गीतेत सांगितलेला अश्वत्थ वृक्ष हा वैकुंठरूपी वृक्षाचं असत् प्रतिबिंब आहे..." वा रे वा ! अशा ह्या अलौकिक विद्वत्तेपुढे आम्ही पामरांनी काय भाष्य करावं ? आता एकदा संपूर्ण भगवद्गीता हेच अतिशुद्ध अध्यात्मिक जगताचं असत् प्रतिबिंब आहे असं जाहीर करून टाका म्हणजे ब्रह्मराक्षसाला ब्रह्मदेव आणि Devil ला भगवान म्हणायला मोकळे हे गावठाण विभागातून आलेले मुंडनवाले ! तुमचं नशीब चांगलं म्हणून आमच्याकडचा अपशब्दांचा साठा संपला अन्यथा तुमच्या प्रपितामहांचीसुद्धा भादरून काढली असती एव्हांना.
ह्यावर आता 'आम्ही' म्हणजे कोण हे विचारू नका. प्रस्तुत लेखकाने स्वतःसाठी वापरलेलं आदरार्थी बहुवचन आहे ते... असो.
. . . देहधारी मनुष्य परमपदापर्यंत जाऊन भगवंतांचं स्वरूप जाणू शकेल का ? परमपदापर्यंत पोहोचणं हे ब-याच जणांना सोपं वाटतं पण त्या पदापर्यंत गेल्यानंतरही भगवंतांचं विराट स्वरूप त्यांना समजत नाही. त्यामुळे त्यांना "परमपद" हा अध्यात्मिक विनोद वाटतो. मुळात भगवंतांचं स्वरूप पूर्णार्थाने जाणणं म्हणजे नक्की काय ? "समस्त जनतेचं एखाद्या विषयावरचं सामूहिक मत म्हणजेच त्या विषयाबाबतची सर्वव्यापी परमेश्वराची इच्छा" अशी निरीश्वरवाद्यांसारखी भूमिका घेऊन काहीच साध्य होत नाही. कारण अशी भूमिका झुडशाहीला (Ochlocracy ला) कधीही विरोध करू शकत नाही. झुंडशाहीतून तयार होणारं सार्वमत म्हणजे ईश्वरेच्छा असा एकदा ग्रह करून घेतलात की आनुषंगिक तर्कानुपाताने तुम्ही "असत्य म्हणजे सत्य", "ब्रह्मराक्षस म्हणजे ब्रह्मदेव" अशी मांडायला सोपी पण पूर्णतया आधारहीन विधानं (specious arguments) करत रहाल.
. . . झुंडशाहीवाल्या ठकसेनांनी जर सार्वमत हवं तसं झुकवून आमच्यावर "फालतू मनुष्य" असा शिक्का मारला तर "हीच ईश्वरेच्छा" असं म्हणत ते दिशाहीन अंधांचं सार्वमत आम्ही शिरोधार्य मानायचं का काय ? आमच्यासारख्या उमद्या घोड्याला डावलून स्वतःच्या गटातल्या वशिल्याच्या गाढवांची "अरबी घोडे" म्हणून कितीही प्रसिद्धी केलीत तरी प्रत्यक्ष शर्यतीत अशी गाढवं कधीही जिंकू शकत नाहीत. ठकसेन जर ह्या गाढवांना विविध संसाधनांचा लायकीपेक्षा जास्त पुरवठा करून शर्यतीत पुढे नेऊ शकतात, तर सर्वव्यापी भगवंतांना अनन्य भावाने शरण गेल्यावर भगवान आम्हांला शर्यतीत पुढे नेऊ शकणार नाहीत, असं वाटतं का काय ह्या उडाणटप्पूंना ? वैयक्तिक अहंभावापेक्षा हल्ली सामूहिक अहंभाव (collective paranoia) हाच जास्त तापदायक व्हायला लागलाय. समूहात सामील झालेलं प्रत्येक माकड स्वतःला बृहस्पती समजायला लागलं आहे.
. . . झुंडशाहीचा प्रतिकार कसा करायचा ते परमपदापर्यंत गेल्यावर कळतं. खरं तर परमपदावर जाऊन परमगती किंवा सिद्धी मिळवल्यावर बरंच काही करता येतं. पण वंशवाद्यांचा उदो करणा-या मुंडनवाल्यांना मात्र ह्यातलं काहीच आवडत नाही, रुचत नाही आणि पचतही नाही. कारण ह्या सगळ्याचा अर्थ असा होतो की कोणतीही व्यक्ती कितीही नीच योनीत जन्माला आलेली असली तरी खडतर योगसाधनेच्या क्लेशकारक मार्गावर चालत राहून स्वतःचं अध्यात्मिक बल वाढवू शकते आणि त्या उन्नत आत्मबलाद्वारे परमपदापर्यंत जाऊन सिद्धी प्राप्त करू शकते. त्यासाठी गुरूची गरज लागतेच असं नाही : 
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येSपि स्युः पापयोनयः | 
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परां गतिम् |
अशी कोणत्याही ज्ञातीतली कोणतीही व्यक्ती परमपद मिळवू शकली तर मग वंशवादी उच्चवर्णियांचा आब तो काय राहिला ? तेव्हां मग हे वंशवाद्यांच्या तालावर नाचणारे वेदवेत्ते संपूर्ण भगवद्गीताच उलटी फिरवायला बघतात. "परमात्मा म्हणजे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान परमेश्वर" अशी अधांतरी व्याख्या करून "जीवात्मा हा कधीही परमात्मा बनू शकत नाही" असं म्हणत संपूर्ण भगवद्गीतेला ते व्यावहारिक जगापासून लांब न्यायला बघतात, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती ह्यांच्यामधल्या संघर्षापासून दूर न्यायला बघतात आणि अखेर १५ व्या अध्यायातल्या १७ व्या श्लोकाचं निरुपण करतांना ते अनेक कोलांटउड्या मारत चकण्यासारखं विवेचन करत बसतात ! असो. 
. . . वर म्हटल्याप्रमाणे झुंडशाहीला प्रभावी विरोध करण्याची क्षमता प्राप्त होणं हे परमपदापर्यंत गेल्यावर प्राप्त होणा-या एकूण क्षमतेचा केवळ एक हिस्सा आहे. भगवंतांच्या अनेक दिव्य शक्ती ह्या परमपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीला वापरता येतात. इथे दिव्य शक्ती म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया. पूर्णब्रह्म म्हणजे काय ते न समजलेल्या मूढमतीला भवसागराची अनेक समीकरणं ही अनाकलनीय भासतात. ह्या समीकरणांचा यथायोग्य वापर केल्यामुळेच परमपुरुष हा भवसागरात बुडत नाही :
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया | 
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते |
पण अज्ञानी मूढमती मात्र तेवढ्याच वादळवा-याचा सामना करता करता गटांगळ्या खायला लागतो आणि अखेरीस बुडतो. त्यामुळेच अशा अज्ञ मठ्ठोबांपुढे तुम्ही परमपदावरच्या दिव्य शक्तींचं कितीही वर्णन केलंत तरी त्यांना ते पटत नाही, समजत नाही कारण अहंकाराच्या भुश्याने भरलेल्या त्यांच्या कवट्यांमधल्या मेंदूची तेवढी क्षमताच नसते. त्यामुळे "जीवात्मा हा कधीही परमात्मा असू शकत नाही" एवढंच तुणतुणं वाजवत ते तुमचा प्रतिवाद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातात.
. . . परमपदावर आरूढ झालेल्या परमपुरुषाला भगवंतांच्या अनेक दिव्य शक्ती यथास्थित वापरता आल्या की अशा परमपुरुषाला सिद्धी प्राप्त झाली असं म्हणता येतं : 
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् | 
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः |
थोडक्यात सांगायचं तर अशा परमगतीला प्राप्त झालेला परमपुरुष म्हणजे व्यावहारिक पातळीवर, मनुष्यदेहाच्या मर्यादांचं उल्लंघन न करता वास्तवात उतरवता येऊ शकणारं साक्षात् भगवत्स्वरूप ! हॉलिवूड चित्रपट Insurgent मधे अशा परमपुरुषाला 100% divergent म्हणून संबोधलं आहे. अर्थातच ते निरीश्वरवादी चौकटीतून केलेलं विश्लेषण आहे. जिनी गटातल्या ठकसेनांना असा 100% divergent कधीही सापडू शकत नाही कारण :
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः | 
मूढोSयं नाभिजानाति लोको माम् अजम् अव्ययम् |
हे भगवंतांना लागू असणारं वचन साक्षात् भगवत्स्वरूप अशा परमपुरुषालाही काही अंशी लागू पडतं !
. . . मनुष्यदेहाच्या मर्यादांचं उल्लंघन हे कोणालाच करता येत नाही. स्वतः भगवंतांना जरी ते शक्य असलं तरीसुद्धा जेव्हां ते पृथ्वीवर मनुष्यरूपाने अवतार घेतात तेव्हां ते ह्या मर्यादांचं भान कधीच सोडत नाहीत. म्हणूनच प्रभु रामचंद्र काय किंवा भगवान श्रीकृष्ण काय शैशवावस्था, कुमारवय, गुरुगृही शिक्षण आणि अवतारसमाप्ती अशा मायेच्या पसा-याशी सुसंगत असणा-या सर्व प्रक्रियांमधून ते जातातच. नाहीतर स्वतः भगवंतांना ज्ञानप्राप्तीसाठी मनुष्यदेहधारी गुरूची गरज का भासावी ? पण स्वतःच काही विशिष्ट नियमांच्या आधारे रचलेल्या सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन स्वतः भगवान कधीही करत नाहीत. त्यामुळे असे सृष्टीचे नियम सर्वांना पाळावेच लागतात, परमपुरुष हाही त्या नियमांना अपवाद नसतो. म्हणजेच परमपुरुषाच्या पोटात सुरा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढलात तर तो मरेल की नाही ? नक्कीच मरेल. त्या परमपुरुषाला विष पाजलंत तर तो मरेल की नाही ? नक्कीच मरेल. "दिव्य शक्तींचा वापर करून मुडद्याला जिवंत करून दाखव" असं जर परमपुरुषाला सांगितलंत तर ते काम तो करू शकेल की नाही ? कदापि करू शकणार नाही. 

2 comments:

  1. परमपुरुषाला सिद्धी प्राप्त झाल्यावर तो कशा पद्धतीने ह्या शक्तीचा वापर करू शकतो हे "आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा" ह्या पुढच्या post वरून स्पष्ट होईल...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete